स्नेह संमेलन

२००९ पासून संस्थेने कार्याचा श्री गणेशा करून मार्गक्रमणास सूरुवात झाली. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती या शिक्षणाच्या कार्याला जोडल्या गेल्या. बॅंक व्यवस्थापक, वकील, CA, इंजीनिअर, शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक, संगणक तंत्रज्ञ, क्रीडापटू आणि गृहिणी अशा विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त आणि कार्यरत व्यक्तिंनी बाल प्रबोधिनी चे प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम केलं. अशा सर्वांना संस्थेचे स्वयंसेवी शिक्षक म्हणून संस्थेमार्फत प्रमाणित करण्यात आलं.

आपल्याला मिळालेला आनंद त्यांनी इतरांनही मिळावा या हेतूने या स्वयंसेवी शिक्षकांनी कार्याचा मौखिक प्रचार केला. त्यातून अधिकाधिक शिक्षक संस्थेच्या कार्याशी जोडले गेले. कार्य क्षेत्र विस्तारित होत गेलं आणि अजूनही विस्तार चालू आहे. बॉम्बे सेंट्रल ते दहिसर ही शहरे आणि, परळ ते कल्याण ह्या पट्ट्यातील शहरे, पुणे, कोकण अशा विविध ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये बाल प्रबोधिनी उपक्रम सुरू झाला. संस्थेचा प्रत्येक स्वयंसेवी शिक्षक हा आधी स्वत: बाल प्रबोधिनीच्या मूशीत तयार होतो आणि निरपेक्ष भावाने विद्यार्थी घडविण्यासाठी कार्य करू लागतो. हे सर्व कार्य आपलं दैनंदिन कामकाज सांभाळून करत असताना आपल्या सारखे सर्व शिक्षक एका छत्राखाली एकत्र येणं नितांत गरजेचं असतं. ज्यामधून प्रत्येकाला बाल प्रबोधिनीच्या कुटुंबातील प्रणेते, विश्वस्त,समन्वयक, विभाग प्रमुख, उपकेंद्र प्रमुख आणि शिक्षक या सर्वांचा परिचय होतो. आपल्या परिवाराचा विस्तार पाहून उर्जा मिळते. विचार विनिमयातून अधिक शिकता येतं.भावी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते. या सर्व गोष्टी एकत्रित रित्या साधता याव्यात यासाठी संस्थेचे संस्थापक आणि प्रणेते परमपूज्य भाऊ यांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून दरवर्षी सातत्याने ( २०१९-२० आणि २०२०-२१ ही करोना काळातील शैक्षणिक वर्ष वगळता) उत्साहाने हा सोहळा साजरा केला जातो .

या कार्यक्रमात सर्व उप केंद्रांतील शिक्षक, विश्वस्त, समन्वयक एकत्र येतात. शिक्षकांना प्रमाण पत्र आणि विशेष कार्याबद्दल गुण गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात येतं. शिक्षक आपल्या विशेष गुणांचे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादरीकरण करतात. संस्थेमार्फत विशेष स्नेह भोजन कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता होते. पुढील वर्षी काय नवीन सादर करता येईल याची चर्चा करत आनंदी आणि तृप्त मनाने सर्व जण आपापल्या घरी परततात.

स्नेह संमेलन

२२ मार्च २०२५ रोजी दादर येथे झालेले स्नेह संमेलन

स्नेह संमेलन

२०२४ मध्ये झालेले स्नेह संमेलन

स्नेह संमेलन

२०१९ मध्ये झालेले स्नेह संमेलन